Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजभाजपचे अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश; आणि शिवसेनेत जोराची ...

भाजपचे अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश; आणि शिवसेनेत जोराची खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

चाकण – खेड तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्याने खेड तालुका उबाठा शिवसेनेत जोराची खळबळ उडाली आहे. लोकसभेच्या निवडणुका सध्या होत असल्याने विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे. खेडची विधानसभेची जागा ही उद्धव ठाकरे शिवसेना गटासाठी आहे.

भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभेच्या जागेवर दावा सांगेल. उमेदवारीचा शब्द देशमुखांना जेष्ठ नेते शरद पवार, अमोल कोल्हे यांच्याकडुन मिळाला आहे का? त्यामुळे देशमुखांचा प्रवेश विधानसभेच्या अगोदर या जागेवर दावा सांगण्यासाठी आहे का व त्यांची उमेदवारी निश्चित केली जात आहे का? असे विविध प्रश्न निर्माण झाल्याने उबाठा शिवसेना गटामध्ये खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अतुल देशमुख यांनी खेड तालुक्यात यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढविली आहे. त्यांनी निवडणूक आमदार दिलीप मोहिते आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधात लढवली होती. देशमुख यांना अपक्ष असताना 55 हजार मते पडली होती. देशमुख यांचा 2024 ची खेड विधानसभा निवडणुक पुन्हा लढविण्याचा व पराभवाचा वचपा काढण्याचा कल आहे.

त्यामुळे त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे अशी जोरदार चर्चा आहे. विधानसभेच्या जागेवर देशमुख दावा सांगतील त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारातही न जाता जोपर्यंत विधानसभेची जागा शिवसेना गटाला मिळत नाही हे स्पष्टीकरण वरिष्ठाकडून होत नाही तोपर्यंत खासदार कोल्ह्यांचा प्रचार करणार नाही असाही काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा होरा आहे.

परंतु प्रमुख पदाधिकारी मात्र खासदार कोल्हे यांचा प्रचार थांबलेला नाही आम्ही प्रचार करत आहोत हे सांगत आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी सांगितले की,’ देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशामुळे काही फरक पडलेला नाही. आम्ही खासदार कोल्हे यांचा प्रचार करत आहोत असे स्पष्ट केलेले आहे. खेड तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे.

सगळ्यांचा संभ्रम दूर झालेला आहे.’ खेड तालुका शिवसेनेचे प्रमुख रामदास धनवटे यांनी सांगितले की,’ महाविकास आघाडीचा प्रचार आम्ही थांबवलेला नाही. खासदार कोल्हे यांचा प्रचार शिवसेना करत आहे. विधानसभा निवडणुकी वेळी पाहू परंतु विधानसभेची जागाही शिवसेनेचीच आहे. ‘देशमुख हे आमदार मोहिते यांचे कट्टर विरोधक समजले जातात त्यांनी भाजप सोडताना भाजपातील काही विषयावर भाष्य केले.

आमदार मोहिते यांच्यावर ही टिका केली. परंतु महायुतीचे येत्या विधानसभेचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते हे मात्र नक्कीच समजले जातात. आमदार दिलीप मोहिते हे महायुतीचे उमेदवार माजी खासदार आढळराव पाटील यांचा प्रचार जोरात करत आहेत. त्यामुळे आमदार मोहिते यांच्या म्हणण्यानुसार खेड तालुक्यात महायुतीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळेल.

अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे. देशमुख हे 2024 ची विधानसभेची निवडणूक लढविणार आहे हे मात्र नक्की आहे. शिवसेनेत ही अनेकजणांनी आमदारकीची स्वप्न पाहिलेली आहेत. यामध्ये अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, अमोल पवार, शिवाजी वर्षे, रामदास धनवटे, राहुल गोरे हे ही विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभेची खेडची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना सोडणार नाही यावर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र ठाम आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाते की उबाठा शिवसेनेकडे राहते हे मात्र पाहणे उत्सुक्याचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments