इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
डोर्लेवाडी, (पुणे) : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत झारगडवाडी येथे सन 2020-21 ते सन 2023-24 मध्ये झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय व दफ्तरी तपासणी अहवालात तपासणी केली. यामध्ये अनियमितता आढळून आल्याने तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठविला आहे.
अधिक माहिती अशी की, ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज पोटे यांनी या गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषद, पुणे यांच्याकडे 7 प्रमुख मुद्यांवर आधारित तक्रार दाखल केली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत विशेष समिती स्थापन करून सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत प्रशासकीय आणि दप्तरी अनियमितता मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन अहवाल विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.
ग्रामपंचायत झारगडवाडीतील कारभार नागरिकांना विश्वासात न घेता आणि पारदर्शकतेचा अभाव ठेवून बेकायदेशीरपणे चालतो. त्यामुळे गावाचा विकास रखडत आहे. विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. “झारगडवाडीसह इतर गावांमध्येही अशाच प्रकारे विकासकामांत भ्रष्टाचार होत आहे.
माननीय पालकमंत्री अजित दादा पवार यांनी याकडे तातडीने लक्ष घालावे. प्रत्येक गावातील विकासकामे तपासण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून त्यांच्या गुणवत्तेचा वेळोवेळी आढावा घ्यावा. अन्यथा गावाच्या विकासावर प्रशासकीय अनियमिततेचे गडद सावट राहील,” असे मत युवराज पोटे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, झारगडवाडी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीनंतर आता विभागीय आयुक्त यावर कोणती ठोस कार्यवाही करणार, याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून आहे