इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून आणखी तिघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.
रुपेश राजेंद्र मोहोळ (वय-22, शिवणे), करण राहुल साळवे (वय-19, उत्तम नगर) आणि शिवम अरविंद कोहाड (वय-20, उत्तम नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात यांचा सहभाग असल्याचे समोर येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 14 वर गेली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलीसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्याआधी शुटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.
दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आली होती. कारण लॉरेन्स बिश्नोई गँगकडून याआधी सलमान खानला बऱ्याचदा धमक्या आल्या आहेत. सलमान खानच्या सर्व कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या सलमान खान सोबतच्या जवळीकतेमुळे झाल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगने केला होता.