इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट बँकेत फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून आरोपींनी बँकेत दरोडा टाकण्याची योजना आखली होती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचा दरवाजाही फोडला होता.
दरवाजा तोडल्यानंतर तो एकटाच दरोडा टाकण्यासाठी बँकेत घुसला, मात्र तेवढ्यात बँकेतील इमर्जन्सी अलार्म वाजला. अलार्म वाजल्यानंतर त्याने बँकेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो पकडला गेला.
समीर अन्सारी असं आठवी पास झालेल्या या तरुणाचं नाव आहे. त्याची दरोड्याची योजना ऐकून पोलीसही चकित झाले. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या तरुणाने यूट्यूब व्हिडीओ पाहून दरोड्याची योजना आखली होती. आरोपी पुरुलिया हुडा पोलीस ठाण्याच्या दुमदुमी गावात आहे.
पुरुलिया जिल्ह्याचे पोलीस एसपी अभिजीत बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण दरोड्याच्या घटनेच्या मोडस ऑपरेंडीची सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी ड्रिल मशीन, जॅमर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे वापरली होती. युट्युबवरून त्याने प्रशिक्षण घेतलं होतं.
एसपीने पुढे सांगितले की त्याच्या घरातून उपकरणांशी जुळणाऱ्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. आता त्याच्यासोबत आणखी कोणी होतं की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्याच्या एसपींनी असंही सांगितलं की बँकेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी बँकेचा दरवाजा बाहेरून लावला होता जेणेकरून पाहणाऱ्यांना सर्व काही ठीक आहे असं वाटेल. त्याने आपला चेहरा मास्कने झाकला होता.
गेल्या शनिवारी रात्री 8.50 च्या सुमारास पुरुलिया-बांकुरा 60-ए राष्ट्रीय महामार्गावरील हुडा येथे सरकारी बँक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. बँकेचा इमर्जन्सी अलार्म वाजताच तो पळून गेला. पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून बॅग, अत्याधुनिक व्हॉल्ट कटर आणि वायर जप्त केली आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख पटवली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.