Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबाणेर परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक

बाणेर परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बाणेर रस्त्यावरील सकाळनगर भागात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना चतुः शृंगी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महम्मद रईस अब्दुल आहद शेख (वय ३७, रा. मालवणी, मुंबई) आणि महम्मद रिझवान हनीफ शेख (वय ३३, रा जोगेश्वरी पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील सकाळनगर भागात २३ फेब्रुवारी रोजी भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी चतुः शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले होते.

त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच, तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला. त्यात चोरटे मुंबई परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नालासोपारा, पालघर आणि जोगेश्वरी येथून आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मुंबईतून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा २० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments