इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : थेरगाव येथील प्रसुनधाम हौसींग सोसायटी शेजारी 18 मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव चिंचवड हा फुलपाखरू पुल बांधण्याचे काम महापालिकेने 2017 मध्ये हाती घेतले होते. मात्र मुदत संपल्यानंतरही या पुलाचे काम अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना या पुलासाठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचवड गावातून थेरगावाच्या दिशेने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पवना नदीवरील फुलपाखरू (बटरफ्लाय) आकारातील पुलाचे काम अपूर्णच राहिल्याने संबंधित ठेकेदाराला दिवसाला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. सात वर्षानंतर ही काम अपूर्णच राहिल्याने नागरिक या पुलाच्या प्रतीक्षेतच राहिले आहेत. 25 कोटी रुपयांच्या पुलावर 40 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. दरम्यान महिना अखेरीस पुलाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान या पुलाची लांबी 107 मीटर तर रुंदी 18 मीटर आहे. 18 महिन्यांच्या मुदतीत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामास 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती मात्र तरी देखील हे काम पूर्ण झाले नाही. या पुलाच्या दोन टप्प्यातील कामावर 39 कोटी 74 लाख रुपये खर्च होऊनही या पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. आता या पुलाचे उर्वरित काम करण्याकरता नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.