इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची समोर आली आहे. ही घटना सुखसागरनगर परिसरात घडली आहे. ऋषीकेश दीपक खोपडे (वय 26, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
याप्रकरणी प्रणव प्रशांत जगताप (वय 25, रा. बिबवेवाडी), सार्थक संतोष भोर (वय 21, रा. धनकवडी), कुमार तुळशीराम भागवत (वय 24), अमर अशोक लोंढे (वय 20, दोघे रा. कात्रज) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश खोपडे या तरुणाचे एका तरुणी सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित ऋषीकेश खोपडे सुखसागरनर परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला अडवून लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत ऋषीकेश खोपडे हा तरुण गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान पीडित ऋषीकेश खोपडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपास करत पसार झालेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.