इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात उडी मारलेल्या प्रेमी युगलाचे मृतदेह 32 तासांनंतर सापडले आहेत. कविता सुनिल पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे असे मृतांची नावे आहेत. आदिवासी प्रेमी युगलाने आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी-टाकेवाडी दरम्यान असलेल्या डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या होत्या. त्यानंतर कविता आणि पप्पू यांना शोधलं जात होतं. अखेर 32 तासा नंतर या प्रेमी युगलाचा मृतदेह टाकेवाडी आणि कळंब कालव्याच्या पाण्यात आढळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता, पप्पू आणि कविताच्या मामाची अल्पवयीन मुलगी दिव्या राजाराम काळे हे दुचाकीवरून टाकेवाडी जवळील ठाकरवाडीकडे जात होते. शनिवार 5 एप्रिलला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास टाकेवाडी गावाजवळील डाव्या कालव्याजवळ आले. तेथे कविता आणि पप्पू यांच्यात भांडण झालं. त्यानंतर कविताने कालव्यात उडी मारली. कविताला वाचवण्यासाठी तत्काळ पप्पूनेही कालव्यात उडी घेतली. दोघेही पाण्यात बुडाल्याने दिसेनासे झाल्यानंतर दिव्याने घाबरलेल्या अवस्थेत तेथे जवळच असणाऱ्या शेतकरी रामदास चिखले यांच्याकडे जाऊन घडलेला प्रकार सांगितला
त्यानंतर गावातील पोलीस पाटील आणि उपसरपंचासह ग्रामस्थांनी कविता आणि पप्पूचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर दोघेही मिळून न आल्यामुळे पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
अखेर दोघांचाही मृतदेह सापडला
दरम्यान, डाव्या कालव्याला 400 क्युसेकने पाणी वाहत असल्याने बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेता येत नव्हता. त्यामुळे मंचर पोलिसांनी तहसीलदारांकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर रविवारी दुपारी 1 वाजता कळंब गावाच्या हद्दीत कविताचा मृतदेह पुलाच्या कॉलमला अडकलेल्या अवस्थेत सापडला तर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत कालव्यात पप्पूचा मृतदेह शेतीच्या मोटारीच्या पाईपला अडकलेल्या अवस्थेत आढळला.
दोघांचाही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.