इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सुमारे १५०० कोटी रुपये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एका क्लिकवर दिला जाणार आहे. यात पुण्यातील १९ हजार लाभार्थी असून ही रक्कम सुमारे ३० कोटी रुपये आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम शनिवार (दि. २२, फेब्रुवारी) रोजी पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पातळीवर-करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू उपस्थित होत्या. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यासह खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. राज्यात २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आली आहे. बालेवाडीच्या कार्यक्रमास सहा हजार लाभार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी ग्रामोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून घरकुल लाभार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.