इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुरंदर (पुणे): पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी कौतुक केले आहे. दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले, ‘पुरंदरची अंजीरं काही वर्षांपूर्वी स्थानिक बाजारपेठेत विक हात होती. मात्र, आता पुरंदरची ही अंजीरं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. असे म्हणत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे जाहीर कौतुक केले आहे.
पंतप्रधान बोलताना म्हणाले, “मागील काही दिवसांपूर्वी जो शेतकरी जवळच्या स्थानिक बाजारपेठेपुरताच मर्यादित होता त्याच्या उत्पादनांसाठी आता जगाच्या बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत. तो तिथे आपले उत्पादन विकू लागला आहे. काश्मीरमधील क्रिकेट बॅट, पुलवामामधील स्नो पिक्स, व पुरंदरचे अंजीर आता जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे.
अलीकडे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याने अंजीर उत्पादकांचा तालुका अशी ओळख प्राप्त केली आहे. तालुक्यातील सोनोरी, काळेवाडी, गुरोळी, दिवे, वनपुरी, पारगाव, पिंपळे, या गावांबरोबरच इतर गावांमध्येही अंजिराचं मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जात आहे.
इतर तालुक्यांच्या तुलनेत पुरंदर तालुका अवर्षणग्रस्त आहे. पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांनी दुष्काळजन्य परिस्थिती असूनही आपल्या मेहनतीने शेतीत क्रांती केली आहे. तालुक्यातील दिवे येथे काही वर्षांपूर्वीच सीताफळ आणि अंजीर संशोधन केंद्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे. तालुक्यातील काळेवाडी आणि जाधववाडी येथील अंजीर प्रक्रिया उद्योगांमध्ये अंजीरबर्फी, रबडी तसेच आईस्क्रीम अशा पदार्थांची निर्मिती केली जाते. येथून संपूर्ण देशात तसेच विदेशातही माल पाठवला जात आहे.