इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात लष्कर पोलिस स्टेशन आणि खंडणीविरोधी पथक १, गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईत ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी स्वतःला गुंड सरगणा अरुण गवळीचा पी.ए. असल्याची बतावणी करत बांधकाम व्यवहाराच्या निमित्ताने धमकी दिली होती.
तक्रारीनुसार, दि. २८ जुलै, ४ ऑगस्ट, ९ ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी कार्यालयात असताना, आरोपी रोहन गवारे व त्याच्या साथीदाराच्या सांगण्यावरून सुदर्शन गायके यांनी फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी आरोपी १) रोहन शिवाजी गवारे (३०, पुणे), २) सुदर्शन आसमानराव गायके (२७, संभाजीनगर), ३) महेंद्र रामनाथ शेळके (४२, बीड) आणि ४) कृष्णा परमेश्वर बुधनर (२६, बीड) यांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, मिलिंद मोहिते, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर आणि खंडणीविरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे यांच्यासह लष्कर पोलिस स्टेशन व गुन्हे शाखेतील अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते. ही मोहीम पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे यशस्वी झाली असून, शहरातील खंडणी रॅकेटवर मोठा आळा बसला आहे.