इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आज आणखी एक धक्कादायक घटना महिलादिनी घडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवली आहे. एवढंच नव्हे तर त्याने चौकात सिग्नलला गाडी थांबवत लघु शंका देखील केली आहे. या अत्यंत घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला उडवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच आता एका बड्या बापाच्या मुलग्याचा कारनामा समोर आल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की बीएमडब्ल्यूएम महागड्या कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित तरुण सिग्नलवर कार थांबवून रस्त्याच्या बाजुला लघुशंका करत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ही बाब आरोपी तरुणाला समजल्यानंतर त्याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाळे केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज जागतिक महिला दिन असून अशा प्रकारची घटना घडल्याने पुन्हा पुण्यात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
याआधी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात वातावरण तापलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.