इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः राज्यात महायुतीच्या घटक पक्षांमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शिंदे गटातील नाराजी समोर येत असतानाच, दुसरीकडे पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यातील तणाव उफाळून आला आहे.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
या बैठकीत स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकाम यासंदर्भात चर्चा सुरू असताना, पद्मावती परिसरातील एका महिला सोसायटी पदाधिकाऱ्याने झोपडपट्टीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती दिली आणि ती थांबवण्याची मागणी केली. यावर शिवसेना पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप करत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी सुभाष जगताप यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला.
काही वेळाने कांबळे यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि थेट सुभाष जगताप यांच्यावरच आरोप केले की, अवैध धंदे सुरू असलेली जागा त्यांचीच आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापले आणि दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
या प्रकारामुळे मोहल्ला कमिटीची बैठक राजकीय राड्यात रूपांतरित झाली, आणि पुण्यातही महायुतीतील अंतर्गत वाद खुलेआम समोर येत असल्याचे दिसून आले.