इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील वाकड परिसरातील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेल जवळ एका आलिशान कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमधील दोन तरुण जखमी झाले असून दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
हा अपघात मुंबई – पुणे महामार्गावर घडला असून कारने दुचाकीला जोराची धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तरुण दूर जाऊन पडले, पाठीमागे कोणतेही मोठे वाहन नसल्याने दोघांचेही जीव थोडक्यात वाचले. ही घटना बाजूने चाललेल्या एका कारच्या डॅशमॅगमध्ये कैद झाली आहे. त्यानुसार यामध्ये दोन तरुण दुचाकीवरून चालले होते त्यावेळी अचानक वेगाने कार येते. दुचाकीला कट मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात कारचालकाचा ताबा सुटून गाडी वेगाने फिरली. आणि कारचा पाठीमागचा भाग दुचाकीला जाऊन धडकला. यानंतर दोन्ही दुचाकीस्वार लांब पडले. त्यानंतर काही लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
दरम्यान दुचाकीस्वार पाठीमागून येणारे वाहन अंगावरून जाण्याच्या भीतीने झटकन उठले आणि दुभाजकाच्या ठिकाणी गेले आणि सुदैवाने थोडक्यात बचावले. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.