इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरात ” बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत वाहतूक पोलिसांनी बुलेट राजांना चांगला दणका दिला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेकडून बुलेट मॉडीफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर सर्जिकल स्ट्राइक करून सुमारे १ हजार ७६८ बुलेट मॉडीफाय सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत.
शहरात बुलेटच्या कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या कर्कश आवाजाने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सवर बसवलेल्या दुचाकी वाहनावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेतील सर्व विभागाकडून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
सध्या तरुणांमध्ये बुलेट दुचाकी वाहनास नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर दिवस-रात्र कर्कश आवाज करत भरगाव वेगाने बुलेट चालवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या आवाजामुळे नागरिकांना अधिक त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे आता सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि ते बसवणाऱ्या मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बुलेट राजांना आता वाहतूक शाखेकडून चांगलाच दणका बसला आहे.