इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरली. प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. आता नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि संघटनात्मक काही फेरबदल करतील हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार आता पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पुन्हा एकदा फिल्डिंग सुरू झाली आहे.
सध्या पुणे शहरांमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे हे कार्यरत आहेत. जर शहराध्यक्ष बदलायचा असेल तर शहर कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी असलेले अजित दरेकर यांना शहराध्यक्ष करावं, यासाठी शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक राहिलेले चंदू कदम यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून त्यांनी आपलं नाव मागे घेतलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता माजी नगरसेवक अविनाश बागवे यांचं नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या गटांकडून पुणे कॉग्रेस शहराध्यक्ष पदासाठीचे वेगवेगळी नावं चर्चेत आहे. आता या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.