इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणाहून फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता पुण्यात फिटजी घोटाळा झाल्याच समोर आलं आहे. यामध्ये 31 विद्यार्थ्यांची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जून २०२४ पासून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फी परत मिळाली नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन बैठकीत क्लास बंद होणार याची माहिती दिली होती. दरम्यान आता पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात फिटजी क्लासेसच्या संचालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये तब्बल ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख २३ हजार ४५४ रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी बरकत कादरी (वय ४८) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली. यावरून फिटजी या खासगी संस्थेचा व्यवस्थापक संचालक दिनेशकुमार गोयल, मनीष आनंद, राजीव बब्बर तसेच राजेशकुमार कर्ण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार २१ जून २०२४ ते २९ मे २०२५ या दरम्यान घडला आहे.
पुण्यातील स्वारगेट भागात असणाऱ्या वेगा सेंटर या इमारतीतील फिटजी या कंपनीचे क्लासेस सुरू होते. विद्यार्थ्यांकडून या खाजगी संस्थेने हजारो रुपये फी च्या स्वरूपात घेतले होते. पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांकडून याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान पालकांनी भरलेल्या फी बाबत वारंवार मेलद्वारे विचारणा करून सुद्धा अनेकांचे पैसे अजूनही परत मिळाले नसल्याचे समोर आलं आहे. एकूण ३१ पालकांची ४५ लाख २३ हजार रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.