इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे आणि पिंपरी-चिंचवडला आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले आहे. विशेषतः हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, कामावर निघालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले हिंजवडी आयटी पार्क (फेज-२ आणि फेज-३) मधील रस्ते जोरदार पावसामुळे जलमय झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात पोहोचता आले नाही, तर काहींनी नाइलाजाने घरातूनच काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) निर्णय घेतला. ” पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नाही का?” असा संतप्त सवाल येथील नागरिक आणि आयटी कर्मचारी विचारत आहेत. पावसाळी कामे योग्य प्रकारे झाली नाहीत, अशीही तक्रार नागरिक करत आहेत.
हिंजवडीच नव्हे, तर औंध, पाषाण, बाणेर रस्ता, बोपोडी, सूस रस्ता, महाळुंगे आणि सूसगाव भागांमध्येही संततधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. पुण्यात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असून, योग्य नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.