इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात गेल्या जानेवारी महिन्यापासून गुइलेन बॅरे सिंड्रोमने थैमान घातले होते. सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता. मात्र आता याच्या रुग्णसंखेत घट झाली असून १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आल्याचे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविले आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्यात जीबीएसचा उद्रेक दूषित पाण्यामुळे होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले होते. त्यानंतर अखेर जीबीएस उद्रेकग्रस्त सिंहगड रस्त्यावरील भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांची चिंता आता मिटली आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या आजाराचा शेवटचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या अधिशयन काळाच्या दुप्पट कालावधीत एकही नवीन रुग्ण न आढळल्यास तो उद्रेक संपुष्टात आल्याचे जाहीर केले जाते. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आल्याचे पत्र पाठवले आहे.
राज्यात जीबीएसचें आतापर्यंत 230 रुग्ण आढळले असून पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महापालिका 46 महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे 95, पिंपरी चिंचवड महापालिका 34, पुणे ग्रामीण 40 अशी रुग्णसंख्या आहे. मात्र या पुणे शहरात जीबीएसचा उद्रेक आता अखेर थांबला आहे.