इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरीः बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून चार लाखांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सुरेंद्र साहेबराव जाधव (वय 56 वर्ष, पद-मंडलाधिकारी, चिंचवड कार्यालय, पिंपरी, पुणे) असे रंगेहाथ पकडलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
तक्रारदार यांनी वाल्हेकरवाडी येथे 6 गुंठे जागा घेवून त्यावर एक बंगला बांधला आहे. नमुद बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी लोकसेवक सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लोकसेवक सुरेंद्र जाधव यांच्याकडे पंचासमक्ष पडताळणी केली असता, जाधव यांनी तक्रारदाराकडे वरील नमुद काम करण्यासाठी तडजोडीअंती साडेचार लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चार मार्च रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक सुरेंद्र जाधव यांनी मागितलेल्या लाच रक्कमेपैकी तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्विकारुन, ती गाडीत ठेवली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर लाच रक्कम पंचासमक्ष गाडीतून जप्त करण्यात आलेली आहे. लोकसेवक सुरेंद्र जाधव यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.