इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे भाजीपाल्यांच्या दरात हलकी तफावत दिसून येत आहे. भाजीपाल्यांचे दर स्थिर राहिले असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्यात इतकीच बाजारात आवक होती. दरम्यान फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि शेवग्याच्या भावात घसरण झाली असून हिरवी मिरची आणि मटारच्या भावात वाढ झाली आहे. तसेच उर्वरित भाज्यांची मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात भावात घसरण झाली असून चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली होती. दरम्यान वाढत्या महागाईच्या दरात भाजीपाल्यांच्या दरात तफावत होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.