Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात गोळीबाराच्या घटना सुरुच... सुरक्षा रक्षक पुरविण्यावरून एकावर गोळीबार तर व्यावसायिकाच्या मुलावर...

पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरुच… सुरक्षा रक्षक पुरविण्यावरून एकावर गोळीबार तर व्यावसायिकाच्या मुलावर रोखले पिस्तूल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः व्यावसायिक वादातून एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी सकाळी घडली. गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या वादातून हा प्रकार घडला. या गोळीबारात जयवंत बापूराव खलाटे (वय ५३, रा. भेकराईनगर, हडपसर) जखमी झाले आहेत.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुधीर रामचंद्र शेडगे आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश सुधीर शेडगे (रा. शेवाळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर शेडगे आणि जयवंत खलाटे हे दोघे लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते दोघेही सुरक्षा रक्षक एजन्सी चालवितात. बुधवारी सकाळी शेवाळवाडीतील नंदिनी ड्रीम सोसायटीसमोर सुरक्षा रक्षक भरतीवरुन शेडगे आणि खलाटे यांच्यात वाद झाला. त्यावेळी शेडगे यांनी पिस्तुलातून खलाटे यांच्या पायावर गोळी झाडली. खलाटे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारांची झाडाझडती-

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात मंगळवारी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची चौकशी करून त्यांना तंबी देण्यात आली. पुण्यात गोळीबाराच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर रोखले पिस्तूल-

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. खडकी) यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु पिस्तुलातून गोळी फायर न झाल्यामुळे अरगडे बचावले. ही घटना जंगली महाराज रस्त्यावरील मोबाईल शोरूमजवळ मंगळवारी सायंकाळी घडली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशचंद्र अरगडे बांधकाम व्यावसायिक आहेत. धीरज त्यांचा मुलगा असून, त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धीरज अरगडे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोटारीतून घरी निघाले होते.

त्यावेळी मोटारीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरुणाने धीरज यांच्यावर पिस्तुल रोखले. त्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु चाप ओढला गेला नाही. त्यावेळी घाबरलेल्या धीरज यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे हल्लेखोर अरगडे हाईट्स इमारतीच्या गल्लीतून महापालिकेच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments