इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध मानवी सांगाडा दिसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक रस्त्याच्या मधोमध सांगाडा पडलेला दिसताच नागरिकांनी भीतीने गोंधळ घातला. काही वेळातच सांगाडा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. या प्रकारामुळे चौकात वाहतूक कोंडीही झाली. या सांगाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला अधिकच उधाण आले.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हा खरा मानवी सांगाडा नसल्याचे उघड झाले. सांगाड्याची पाहणी केली असता तो प्लास्टर ऑफ पॅर्पोरेसने बनवलेला कृत्रिम सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. छाती व कमरेचा भाग असलेला हा सांगाडा तारेने जोडलेला होता.
पोलिसांनी सांगितले की, हा सांगाडा प्रयोगशाळेत वापरण्याचा आर्टिफिशल मॉडेल असून त्यामध्ये संशयास्पद असे काहीही आढळून आलेले नाही. नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
मात्र हा प्रयोगशाळेतील सांगाडा रस्त्याच्या मधोमध कसा आला, कुणी आणून टाकला, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिवसाभर चर्चा रंगल्या होत्या.