Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात काँग्रेस-शिवसेनेला धक्का, माजी आमदार धंगेकर, बाबर शिवसेनेत होणार दाखल ? उद्योगमंत्री...

पुण्यात काँग्रेस-शिवसेनेला धक्का, माजी आमदार धंगेकर, बाबर शिवसेनेत होणार दाखल ? उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला पुढाकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, हडपसरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. त्यामुळे येणाऱ्या काळात हे दोन्ही नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लवकरच काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बाबर आणि धंगेकर यांना शिवसेनेत आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून मंत्री सामंत यांनी शिवसैनिकांच्या भेटीसह पदाधिकारी, तसेच विविध संघटना यांच्याशी संवाद वाढवला आहे. तसेच पक्षांतर्गत जे गटातटाचे राजकारण आहे, त्यालाही पूर्णविराम देण्यासाठी ते प्रवत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. संघटन बळकट करण्यासाठी आता मंत्री सामंत यांनी विविध पक्षांच्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच गुरुवारी (दि. ३०) हडपसर मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घडवून आणण्यात आली. या वेळी पुण्यातील स्थानिक नेते अजय भोसले हेही उपस्थित होते. या भेटीत बाबर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा झाली किंवा नाही, याबाबत तपशील समजू शकला नाही.

मात्र, येत्या काही दिवसांत बाबर शिवसेनेत प्रवेश करतील ही चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. तर, दुसरीकडे कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धंगेकर हेही काँग्रेस अंतर्गत राजकारणाला वैतागून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पुण्यातील दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात होईल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून देण्यात आली.

धंगेकर कामासाठी भेटले

दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत धंगेकर काही कामानिमित्त भेटायला आले होते. मात्र, पक्षप्रवेशाबाबत स्पष्टता व्यक्त केली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments