इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एसटी बसच्या धडकेत दोन्ही पायांवरून चाक गेल्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजय गोपाळ गेजगे (रा. पर्वती पायथा) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजय गेजगे यांचा मित्र आशिष मारुती भालेराव (वय-३४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गेजगे मंगळवारी (दि. ४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पर्वती पायथा परिसरातून दुचाकीवर निघाले होते. रस्त्याच्या बाजूला थांबून ते दुचाकी स्टँडवर लावत असताना गेजगे यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे ते रस्त्यावर खाली पडले. त्याचवेळी स्वारगेटच्या दिशेने निघालेल्या एसटी बसचे पुढील चाक विजय यांच्या दोन्ही पायांवरून गेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विजय यांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान विजय यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एसटी बस चालक मात्र पसार झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल नामदे करीत आहेत.