इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला आहे. फसवणुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचे पुणे पोलिसांनी धागेदोरे शोधून काढत, आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. या फसवणुकीची तक्रार दाखल होताच पुणे सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात १४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम शिवणे येथील ‘आदियोगी स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी’ नावाच्या कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले, या आधारावर पोलिसांनी कंपनीचा संचालक अनिकेत प्रशांत भाडळे याला तात्काळ अटक केली.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्यांशी अग्रवाल आणि अशोक रेड्डी यांसारख्या व्यक्तींनी कॉल आणि व्हॉट्सअॅप चॅटद्वारे संपर्क साधला असता त्यांना ‘त्रशुन्या’ नावाचे एक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. या टोळीने बनावट कंपन्यांच्या नावाखाली शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या अॅपद्वारे बनावट शेअर्समध्ये गुंतवणूक दाखवून तब्बल ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नन्हे येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी नोरबु शेर्पा (वय २८) आणि अंग नुरी शेर्पा (वय २१) या नेपाळी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबतच सागर मच्छिंद्र गायकवाड (वय २६, रा. गणेशमळा, सिंहगड रस्ता) आणि शिवतेज अशोक गुंजकर (वय ३३, रा. जांभूळवाडी, आंबेगाव) यांनाही अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी फसवणुकीची रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी आणि गुन्ह्यांसाठी आवश्यक असलेली बँक खाती व सिमकार्ड उपलब्ध करून देत होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त विवेक मासाळसह यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.