इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वेल्हे, (पुणे) : राजगड किल्ल्यावर दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करताना झालेल्या धुरामुळे चवताळलेल्या आग्या मोहाळाच्या मधमाशांच्या हल्ल्यात ४५ पर्यटक जखमी झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार रविवारी (दि. ३) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पद्मावती माचीच्या परिसरात घडला आहे.
गडावर रविवारी जवळपास तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातच मधमाश्यांनी हल्ला केल्याने पर्यटकांची चांगलीच धावपळ झाली. जिकडे रस्ता दिसेल तिकडे पर्यटक धावत सुटले. काही पर्यटकांनी पद्मावती तलावात उड्या मारल्या. बालेकिल्ल्याच्या खाली व बालेकिल्ल्याच्या खाली असलेल्या कड्यावर आग्या मोहळाची वीसहून अधिक पोळी आहेत.
पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे म्हणाले की, पर्यटकांच्या सुगंधी अत्तराच्या वासाने पोळे उठले. माश्यांनी पर्यटकांचा चावा घेण्यास सुरुवात केली. मधमाश्यांच्या हल्ल्यात ४५ पर्यटक जखमी झाले. तर चार पर्यटकांना त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पहारेकऱ्यांनी या हल्ल्यानंतर सुवेळा माचीकडे जाण्यास पर्यटकांना मनाई केली. त्यामुळे काही उन्मत्त पर्यटकांनी पाहरेकरी सावळे, विशाल पिलावरे यांच्याशी हुज्जत घातली.