इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या अगोदर क्रिकेटच मैदान गाजवलेल्या अनेक खेळाडूंनी खेळाला अलविदा केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. अशातच आता पुण्यातील माजी क्रिकेटपटूने खेळाच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उडी मारली आहे. पुण्यातील माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार तसेच रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्याच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती. त्याचबरोबर त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता केदार जाधव हा क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उतरत आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्याचा आज अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती…
2024 मध्ये टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केदार जाधव याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्याने क्रिकेटला गुडबाय केलं होतं. त्याच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकेविरोधातील सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात केली होती.