इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी हा ई-मेल गांभीर्याने घेऊन संपूर्ण महाविद्यालय बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) मदतीने तपासले. परंतु, संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही.
या प्रकरणी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मंदार दत्तात्रय करमरकर (वय-55, रा. पर्वती दर्शन) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात ई-मेल धारकाविरुद्ध तक्रार दिली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ई-मेल आयडीवर एका व्यक्तीने दोन वेळा ई-मेल पाठवण्यात आला आहे. त्या ई-मेलमध्ये तामिळनाडूतील एका घटनेचा संदर्भ देत महाविद्यालय आणि वसतिगृह परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या माहितीचा उल्लेख करण्यात आला. या प्रकरणाची माहिती समजताच डॉ. मंदार करमरकर यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय आणि वसतिगृह परिसराची तपासणी केली. यावेळी बीडीडीएस पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याच्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. ई मेलची तांत्रिक तपासणी केली असता, तो परदेशातून आल्याचे माहिती समोर येत आहे. ई मेलमध्ये स्पष्टपणे अशी कोणतीही धमकी नव्हती. मेल करणाऱ्याला नक्की काय म्हणायचे हे पाठवलेल्या संदेशात कळत नव्हते. मात्र बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.
याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.