इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार घडलेल्या घटनेने एसटी महामंडळ निशाण्यावर आले. बस स्थानकात अशा प्रकारच्या घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. आता या सगळ्या प्रकरणानंतर राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाच्या चालक वाहनांनी कर्तव्यावर असताना गणवेश परिधान करूनच कामगिरी करणे आवश्यक आहे असे आदेशच एसटी मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र वाहतूक भवनामधून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार वाहक चालकांना गणवेशाची सक्ती करण्यात आली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत चालक वाहकांना गणवेश परिधान करूनच कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मात्र खाकी गणवेशाशिवाय अन्य गणवेशामध्ये चालक वाहक कर्तव्यावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महामंडळाची प्रतिमा खराब होत असून प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेबाबतीत शंका उपस्थित होत आहे. त्यानुसार चालक वाहक व सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या गणवेशातच कर्तव्य बजावण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत.
या प्रकरणानंतर एसटी मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र वाहतूक भवन मधून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये कोणत्याही परिस्थितीत चालक वाहकांना खाकी रंगाचे लोगो एम्ब्रॉयडरी केलेले टी-शर्ट गणवेश म्हणून परिधान करण्यास पूर्ण बंदी घालावी असे स्पष्ट करण्यात आला आहे. दरम्यान या आदेशानंतर मार्ग तपासणी पथकामार्फत सुरक्षा व दक्षता शाखेतील तपासणीसांकडून व आगार भेटीवरील सर्व संबंधितांकडून गणवेश नियमांचे पालन होत असल्याचे तपासणी करणे गरजेचे आहे. नियम भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना या नियमाचे कडक पालन करावे लागणार आहे.