इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि महसूल विषयक कामाचा वाढता व्याप लक्षात घेता पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे. या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामाचे विभाजन करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार पुणे जिल्ह्यात दोन नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी लवकरच रुजू होणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे सादर केला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. नव्या प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगाव येथे प्रत्येकी एक नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असल्याने पुण्याची प्रशासकीय ताकद वाढणार आहे. बारामती येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांची जबाबदारी असणार आहे. तर आंबेगाव येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तीन तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव जरी फेटाळला असला तरी मोठ्या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामांचे विभाजन करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी लवकरच रुजू होणार आहेत. यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळणार असून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळणार आहे.