इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
हडपसर : पुणे सोलापूर महामार्गावर भैरोबानाला ते शेवाळवाडी पर्यंत असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई करून ४३ हजार चौरसफूट शेड जमीनदोस्त केली. महापालिकेचा मुख्य अतिक्रमण, पथविभाग व बांधकाम विभागाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. रस्त्यात अडथळे ठरणारी पत्र्याची दुकाने, पान टपऱ्या, शेड, ओटे, फलक जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आले.
या कारवाईमुळे सोलापूर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व पालिकेचे तब्बल दोनशे कर्मचारी व अधिकारी वर्ग कारवाईत सहभागी झाला होता. संपूर्ण दिवसभर ही कारवाई झाली.
पुणे-सोलापूर मार्गावर रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई झाली. सकाळी अचानक कारवाई सुरू केल्याने व्यवसायिकाचे धावपळ उडाली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य शेड, पान टपरी, पत्राचे शेड, ओटे, कपड्याच्या दुकाने, फ्रंट मार्जिन, फलक जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले.
कारवाईसाठी चार पथके केली होती. या माध्यमातून तब्बल साडेचारशे ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अतिक्रमण अधिकारी माधव जगताप, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, परिमंडळ ४ चे उपायुक्त प्रसाद काटकर, वानवडी
हडपसर क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, क्षेत्रीय अतिक्रमण अधिकारी सुभाष तळेकर, बांधकाम उपअभियंता विजय दाभाडे, उपअभियंता हनुमंत खलाटे, अतिक्रमण अधिकारी धम्मानंद गायकवाड, संजय जाधव राजेश ढगे, बांधकाम शाखा अभियंता श्रमिक शेवते, सुधीर सातभाई सह इतर अभियंता आदींनी ही कारवाई केली. २५० कर्मचारी, ६० सुरक्षाबल व पोलीस, चार जेसीबी, चार गॅस कटरच्या साह्याने अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली..