इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
येरवडा : येरवडा संगमवाडी परिसरातून वाहणा-या मुळा मुठा नदीतून अनधिकृत व बेकायदेशीररित्या वाळू तस्करी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याकडे अप्पर तहसिलदारांनी सोयीस्कर डोळेझाक केली आहे. या भागातून अवैध पद्धतीने वाळू चोरी करुन विक्री होत आहे. नदी पात्रातून वाळुची चोरी करण्यास JCB, पोकलैंड, ट्रॅक्टर व सदर उपशास लागणारे साहित्य यांच्या मध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून शासनाची फसवणूक करत गौण खनिजाची चोरी केली आहे.
मूळा मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. शहराचे पुरा पासून संरक्षण करणे हे या नदी परिसर विकास प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे परंतु दुर्दैवाने संगमवाडी, येरवडा परिसरात याच नदीकाठच्या काही भागातून वाळू माफिया रात्रीच्या वेळी अवैद्य पद्धतीने बेसुमार वाळू उपसा करताना दिसत आहेत.
नदि पात्राच्या कामाचा फायदा घेऊन हे वाळू माफिया मालामाल होताना दिसून येत आहे. रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत हे वाळू माफिया सक्रियपणे वाळू चोरताना दिसत आहेत, परंतु प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.
या वाळू माफियांना नक्की कोणाचे अभय आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. या परिसरातील नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे तरी देखील प्रशासनाला त्याची कल्पना देखील आहे का नाही असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे.
या नदीपात्रातून होत असणाऱ्या वाळू चोरीचा शोध लावला जाईल का? तसेच सदर वाळू माफियांवर कोणती कडक कारवाई केली जाईल का? महसूल विभाग या प्रकरणाकडे लक्ष देईल का ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहेत.
नदी सुधार प्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून या परिसरातील वाळू माफिया अतिशय शातिर पद्धतीने वाळू चोरी करताना दिसत आहेत, यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा हीदेखील कोणाच्या नजरेस न पडतील अशा ठिकाणी लावून ठेवतात. या वाळू चोरांवर योग्य ती कारवाई करावी व खटले दाखल करण्यात यावे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे..