Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे, शिरूर ५१ टक्के ; मावळ लोकसभेसाठी ५२ टक्के मतदान

पुणे, शिरूर ५१ टक्के ; मावळ लोकसभेसाठी ५२ टक्के मतदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले. पुणे मतदारसंघात अंदाजे ५१.२५ टक्के मतदान झाले. २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानात सुमारे दीड टक्का वाढ झाली असली, तरी मतदारांच्या संख्येतही २१ हजार १६७ ने वाढ झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला असून, सरासरी ५१.४६ टक्के मतदान झाले आहे. मावळ मतदारसंघात ५२.९० टक्के मतदान झाले आहे. तीनही मतदारसंघांची मतमोजणी ४ जूनला होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी सुमारे १० लाख ५६ हजार ३९९ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांच्या संख्येच्या ५१.२५ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मधील निवडणुकीत १९ लाख ९७ हजार ५९४ मतदार होते. त्यापैकी १० लाख ३५ हजार २३६ म्हणजे ४९.८४ टक्के मतदान झाले होते. गतवेळीपेक्षा यंदा दीड टक्क्याने मतदान वाढले आहे, तर मतदारांच्या संख्येत २१ हजारांहून अधिक वाढ झाली आहे. ही टक्केवारी रात्री बारा वाजेपर्यंतची असून अंतिम टक्केवारीत बदल होऊ शकतो.

पुण्यात असे झाले मतदान…

पुणे लोकसभा मतदार संघातील वडगाव शेरी हा सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. यातील मतदारांची संख्या संख्या ४ लाख ६७ हजार ६६९ इतकी असून ४९.७१ टक्के मतदान झाले आहे. त्या खालोखाल कोथरूड विधानसभा मतदारसंघात ४ लाख १४ हजार ७५५ मतदारसंख्या असून ४९.१० टक्के मतदान झाले आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४१ हजार ५५ मतदार संख्येच्या ५२.४३ टक्के मतदान झाले आहे. पुणे कँटोन्मेंट २ लाख ८२ हजार २७० मतदार संख्येपैकी ५०.५२, शिवाजीनगर मतदारसंघात २ लाख ७८ हजार ५३० मतदारांपैकी ४९.७२ टक्के आणि कसबा विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ९९७ मतदार संख्येपैकी ५७.९० टक्के मतदान झाले आहे.

कसब्यात सर्वाधिक, कोथरूडमध्ये कमी मतदान

जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या टक्केवारीनुसार, कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले तर सर्वांत कमी मतदान कोथरूड विधानसभा मतदारसंघात झाले. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. या दोन्ही उमेदवारांसह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

शिरूरला मतदानाचा टक्का घसरला

शिरूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ५१.४६ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात ६१.४५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार?, हे चार जूनला कळणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. भोसरी विधानसभा मतदारसंघात ४६.२१ टक्के, हडपसर ४५.३६ टक्के, जुन्नर ५६.३५ टक्के, खेड-आळंदी ५५.२९ टक्के मतदान झाले तर शिरूर विधानसभा मतदारसंघात ५३.०५ टक्के मतदान झाले आहे. शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह ३२ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये सरळ लढत होती.

मशिनमध्ये तांत्रिक समस्या

पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान करण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व मतदान केंद्रावर मॉक पोल (मतदान यंत्रचाचणी) घेण्यात आली. यावेळी ज्या मशिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली, तसेच मशिन बंद असल्याचे निदर्शनास आले, त्या ठिकाणच्या मशिन मतदानाच्या आधी बदलण्यात आल्या. पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी ३७ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट आणि १७ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले.

मॉडेल कॉलनी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्र बदलल्यावर मतदान सुरू झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्यावेळी २४ बॅलेट युनिट, ८ कंट्रोल युनिट आणि २४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. तसेच शिरूर मतदारसंघात लोणी काळभोर येथील मतदान केंद्रावर ९.२० वाजता तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले होते. बिघाड दुरुस्त केल्यानंतर ९.३५ वाजता मतदान सुरू झाले. मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्यावेळी २४ बॅलेट युनिट, ६ कंट्रोल युनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments