इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी २१ हजार ८५५ हेक्टर म्हणजेच १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. पुणे विभागात हरभऱ्याचे मोठे क्षेत्र आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. यंदाही ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची अधिक पेरणी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांकडून हरभरा पिकांमध्ये विद्यापीठाकडील विजय, विशाल यांसारख्या वाणाची पेरणी केली जात आहे. चालू वर्षी जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले, तरी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु, ज्याठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी लवकर पेरण्या केल्या जात आहेत. विभागात सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक पेरण्या झाल्या असून, सरासरीच्या १० हजार ७०८ हेक्टरपैकी ३ हजार ९६६ हेक्टर म्हणजेच ३७ टक्के पेरणी झाली आहे.