इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे रेल्वे विभागाने चालू आर्थिक वर्षात १.८ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली आहे. घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स (जीसीएमसी) येथे सर्वाधिक ६४७ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. पुणे विभागातील ही सर्वाधिक निर्मिती आहे. त्यामधून वर्षाला ५५ लाख रुपयांची बचत होणार आहे. पुणे रेल्वे विभागात २.७ मेगावॅट ऊर्जा निर्मिती सौरपॅनेलच्या माध्यमातून सुरू झाली आहे. ही वीज रेल्वेस्थानक, तेथील डेपोंसाठी वापरली जात आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाचा विजेचा वर्षाचा खर्च कोट्यवधी रुपयांनी कमी होणार आहे.
या उपक्रमामुळे जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते. हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते आणि ऑपरेटिंग खर्च कमी होतो. रेल्वे अधिकाऱ्यांनी अक्षय ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करून शाश्वत भविष्यासाठी त्यांची वचनबद्धता अधोरेखित केली. हा टप्पा भारतीय रेल्वेच्या हरित पद्धतींचा अवलंब करण्याच्या आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या समर्पणाचे प्रतिबिंबित करतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे रेल्वे विभागाची २.७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची क्षमता झाली आहे. या एकूण प्रकल्पामधून कोट्यावधी रुपयांची वीजबचत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत शुन्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून जास्तीत जास्त सौरउर्जा निर्मिती करून शुन्य कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात सौरऊर्जा निर्मिती वाढविण्याच्या दृष्टीने घोरपडी डिझेल शेड, दौंड आरओएच शेड, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, सातारा रेल्वे स्टेशन अशा १० ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. यासाठी रेल्वेचे वरिष्ठ विद्युत अभियंता यांनी विशेष प्रयत्न करून हा प्रकल्प वाढविण्यावर भर दिला.