Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे मेट्रो सुसाट...! पिंपरी चिंचवड ते स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला

पुणे मेट्रो सुसाट…! पिंपरी चिंचवड ते स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. जानेवारीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मे महिन्यात सुमारे 9 लाखांची वाढ झाली असून मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या आता 90 हजारांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड ते स्वारगेटपर्यंत मेट्रो धावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रवासी संख्येतील वाढ कायम

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे 6 मार्च रोजी केले. त्या दिवसापासून पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोची प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात 17 लाख 55 हजार, फेब्रुवारीत 17 लाख 76 हजार होती. विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये प्रवासी संख्या 22 लाख 58 हजारांवर गेली. त्यानंतर प्रवासी संख्येतील वाढ कायम राहून ती एप्रिलमध्ये 23 लाख 81 हजार आणि मेमध्ये 26 लाख 16 हजारांवर गेली आहे.

मे महिन्यात मेट्रोला ४ कोटी उत्पन्न

पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात सुमारे 60 हजार इतकी होती. रामवाडीपर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न सुमारे 10 लाख रुपये होते. आता मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न तब्बल 14 लाख रुपयांवर पोहोचले आहे. मे महिन्यात मेट्रोला एकूण 4 कोटी 24 लाख 76 हजार 480 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्या पुणे मेट्रो पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर धावत आहे. वनाझ ते रामवाडी मार्गावरील रुबी हॉल ते रामवाडी हा विस्तारित टप्पा मार्चमध्ये सुरू झाला आहे. त्यावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही मेट्रो स्थानके असून हा मार्ग 5.5 किलोमीटरचा आहे.

याचबरोबर पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय मार्ग पुढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे. या भूमिगत मार्गाचे काम सुरू असून तो सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments