इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांची बिनविरोधपणे निवड झाली.
पुणे शहर सहकार विभाग उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी रमाकांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर पतपेढीच्या कार्यालयामध्ये अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवाजीराव खांडेकर यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोधपणे निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, समस्या शासन दरबारी मांडून तसेच शिक्षक शिक्षकेत्तरांच्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले आहे.
तसेच राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, शासकीय निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे राज्यसंघटक म्हणून आणि पुणे जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेच्या सचिव पदाची जबाबदारीही ते अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळत आहेत. पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर पतपेढीचा कारभार पारदर्शकपणे करून सभासदांचे हित जोपासण्याचे काम आपण करणार असल्याचे शिवाजीराव खांडेकर यांनी अध्यक्षनिवडीनंतर बोलताना सांगितले.