इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे महापालिकेकडून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल पावणे अकरा लाख रुपयाची पाणीपट्टी धाडण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक वर्ष संपत आलेले असताना महापालिकेकडून उत्पन्न वाढीसाठी खटाटोप केला जात आहे. मोबाइल क्रमांकावर आलेल्या या चुकीच्या बिलामुळे शनिवार पेठेतील ७५ वर्षांच्या या ज्येष्ठ नागरिकाची झोप उडाली आहे.
शनिवार पेठेत राहणाऱ्या गोविंद गोरे (वय ७५) यांना काही दिवसांपूर्वी महापालिकेतर्फे थकीत पाणीपट्टी भरण्याचा मेसेज आला. दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांचे पाण्याचे बिल त्यांना येते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर महापालिकेचे पाण्याचे बिल थकीत असल्याचा मेसेज आला. त्यांच्याकडे १० लाख ७६ हजार ५९ रुपयांचे बिल थकीत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. हा मेसेज उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. या बनावट बिलाच्या विरोधात संबंधित जेष्ठ नागरिकांनी तक्रार केली असून त्याला अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
या प्रकारामुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाचा रक्तदाब वाढल्याची तक्रार त्यांनी केली असून, त्यांनी महापालिकेकडे याबाबत विचारणा केली असता, महापालिकेने केवळ ‘बघू’ असे उत्तर दिले आहे. त्यानंतर हे बिल रद्द करून मला न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच या बिलामुळे काही बरे वाईट झाले तर महापालिका जबाबदारी घेणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता यावर महापालिका आणखीन काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.