Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे महापालिकेतील अनेक विभाग होणार स्थलांतरित; अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार होणार

पुणे महापालिकेतील अनेक विभाग होणार स्थलांतरित; अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार होणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील आठ विभागांच्या कार्यालयांना तीन दिवसांत कार्यालय स्थलांतर करण्याचे आदेश भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्वरूपात फाईल, जुनी कागदपत्रे अवघ्या तीन दिवसांत स्थलांतरित करावी लागणार आहेत.

पुणे महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये ‘ड’ विंगमध्ये सध्या मुख्य लेखापाल, उपायुक्त, विशेष, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, चाळ विभाग, स्वच्छ सर्वेक्षण अभियान कार्यालय, बांधकाम विकास विभाग यांची भांडार खोली, विधी विभाग यांची भांडार खोली, भूसंपादन विभाग यांची भांडार खोली आहे. या ठिकाणी महत्त्वाचे व खूप जुनी असे कागदपत्रे आहेत. पुणे शहरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून सुमारे २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याअंतर्गत सर्व सोईनीयुक्त असा अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन विभाग उभारला जाणार आहे. यासाठी महापालिकेने जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील ‘ड’ विंगमधील जागा निश्चित केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच एक बैठक घेऊन पुढील एका महिन्यात हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थापत्यविषयक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील या कार्यालयांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. पर्यायी जागा म्हणून मुख्य लेखा व परीक्षण विभागाला तळमजल्यावरची मिळकतकर विभागाची जागा दिली आहे.

उपायुक्त विशेष यांना सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाचव्या मजल्यावरील जागा दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि स्वच्छ सर्वेक्षण विभागाला सावरकर भवन येथे स्थलांतरित केले जाईल. तर उर्वरित सर्व विभागांच्या भांडार विभागांना नायडू रुग्णालय येथील रेकॉर्ड खोलीत जागा देण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता यासंदर्भात आदेश काढून पुढील तीन दिवसात कार्यालय स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. या कार्यालयातील साहित्य हलविण्यासाठी अतिक्रमण विभागातील कर्मचारी व मोटर वाहन विभागातील वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments