इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे महानगरपालिकेतील कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आलेल्या मिळकत कर संकलनप्रमुख पदावरून आता रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्या पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे करसंकलनपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, ३१ मार्चनंतर त्यांना बढती मिळणार असल्याने करसंकलनप्रमुख पदावर कोण काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती केलेल्या महेश पाटील यांनाही पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद हे हवे असल्याने रस्सीखेच सुरू झाली आहे.
प्रतिभा पाटील यांची नियुक्ती ही राज्य सरकारकडून तीन वर्षांपूर्वी झाली आहे. त्यांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जर त्यांना ३१ मार्चनंतर मुदतवाढ मिळाल्यास त्यांच्याकडे करसंकलन प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. तसेच, जर त्यांना मुदतवाढ मिळाली नाही, तर उपायुक्त दर्जाच्या दोन पालिका कर्मचाऱ्यांना करसंकलनप्रमुख पदाची जबाबदारी द्यावी लागणार आहे. दरम्यान, माधव जगताप यांच्याकडून करसंकलनप्रमुख पदाचा कार्यभार काढण्यात आल्याने ते केवळ उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अजूनही कोणताच कारभार नसल्याने शंका उपस्थित केली जात आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता सहा दिवसांचा कालवधी शिल्लक असल्याने १ एप्रिलपासून पालिकेचे करसंकलनप्रमुख कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.