Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे, बारामतीसह जिल्ह्यातील चार मतदारसंघांचा खासदार उद्या ठरणार; जनतेचा कौल नेमका कोणाला?

पुणे, बारामतीसह जिल्ह्यातील चार मतदारसंघांचा खासदार उद्या ठरणार; जनतेचा कौल नेमका कोणाला?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सात टप्प्यात पार पडली. यामध्ये पहिला टप्पा हा 7 मे रोजी सुरु झाला होता. तर अखेर सातव्या टप्प्यातील मतदान एक जूनला पार पडले. त्यानुसार, सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता मंगळवारी (दि.4) याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहिला मिळाली. त्यामुळे या चारही ठिकाणचा निकाल काय येतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी साम-दाम-दंड ही तिन्ही आयुध्दे वापरुन प्रचारात मुसंडी मारली होती. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकांपूर्वी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे यामध्ये कोणाचं पारडं जड राहणार हेदेखील आता यानिमित्ताने स्पष्ट होणार आहे. देशातील 543 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण देशाचे प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिस यंत्रणेकडूनही ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघात अनेक दिग्गज नेते आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये काही उमेदवार यापूर्वी खासदार झालेले आहेत तर काही उमेदवार अगदी नवखे आहेत. विकासाचा अजेंडा घेऊन पुढे आलेल्या या उमेदवारांपैकी कोण विजयी होणार आणि कोणाचा पराभव होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण, या निवडणुकीत आपणच जिंकू असा विश्वास जवळपास सर्वच उमेदवार व्यक्त करत आहेत. त्यामुळे मंगळवारी याचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत अनेक युक्त्या-क्लुप्त्या लढवण्यात आल्या. पण यात यश मिळणार तरी का हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

पुणे लोकसभेत तगडी ‘फाईट’

पुणे लोकसभा मतदारसंघात तीनही उमेदवार हे पुणे महापालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत. यातील मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार असून, त्यांनी पुण्याचे महापौरपदही भूषविले आहे. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते देखील नगरसेवक राहिले आहेत. नंतर अफाट जनपाठिंब्याच्या जोरावर विधानसभेत आमदार म्हणून गेले. आता खासदार होण्याचा त्यांचा मनसुबा आहे. याशिवाय, वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे होणार आहे.

शिरूरमध्ये विद्यमान विरूद्ध दिग्गज लढत

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवली. डॉ. कोल्हे हे खासदार राहिले आहेत. तर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय-मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि यापूर्वी खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. या निवडणुकीत विद्यमान विरूद्ध दिग्गज अशी लढत पाहिला मिळाली. याची मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी (शिरूर) येथे होणार आहे.

मावळमध्ये श्रीरंग बारणे विरूद्ध संजोग वाघेरे

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहिलेले श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांच्या दोन्ही नेत्यांमध्ये प्रमुख लढत झाली. या ठिकाणीची मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे.

बारामतीत नणंद विरूद्ध भावजय

पुण्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अर्थात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली. तर त्यांच्या भावजय असलेल्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात प्रमुख लढत झाल्याचे पाहिला मिळाले. ही निवडणूक दोन्ही गटाने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments