इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
निमगाव भोगी : बँक ऑफ महाराष्ट्रच्या टाकळी हाजी शाखेतील कामकाज तांत्रिक अडचणींमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद होते. ते गुरुवारी (दि. 07) सुरू झाले. पुणे प्राईम न्यूज ने बँकेच्या अडचणींबाबत दोनदा वृत्त प्रकाशित केले होते. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर यंत्रणा सक्रिय झाली.
बँक प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष घालून लवकर सेवा सुरू करावी किंवा याबाबत खुलासा करावा म्हणजे नागरिकांची धावपळ होणार नाही, अशी मागणी सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी केली होती. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताची दखल घेत संबंधितांना बँकेचे कामकाज सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
बँकेचे कामकाज सुरू झाल्याने खातेदारांची ससेहोलपट थांबणार आहे. बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांबरोबरच कर्मचारीही वैतागले होते. खातेदार आणि कर्मचारी यांना दररोज सकाळी टाकळी हाजी शाखेत येऊन तेथून मलठण शाखेत जावे लागत होते. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. खातेदारांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांच्या तासन तास रांगा लागत होत्या.
ऐन दिवाळीत बँक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याबाबत खातेदारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तांत्रिक अडचण दुरुस्त झाली असून कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. कर्मचारी कमी असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ती समस्याही लवकरच दूर होईल, असे शाखा व्यवस्थापक नीलेश निकाळजे यांनी सांगितले.