इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गुजरातमधील व्यापाऱ्याची सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी रिक्षात विसरली होती. ती पोलिसांच्या तत्परतेमुळे रविवारी (दि. १३) परत मिळाली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे व्यापारी वर्गाने पोलिसांचे आभार मानले. तुळशीभाई कलाठिया (वय ४३, रा. सूरत, गुजरात) हे साड्यांचे व्यापारी त्यांचे मित्र पीराराम कलबी, अरुणकुमार दुबे यांच्यासह व्यावसायिक कामासाठी रविवारी (दि. १३) पुण्यात आले होते. नाना पेठेतील एका हॉटेलमध्ये ते वास्तव्यास होते. ते रविवारी दुपारी लक्ष्मी रस्त्यावरुन रिक्षाने नाना पेठेतील हॉटेलवर आले. प्रवासात कलाठिया यांची पिशवी रिक्षात विसरली. त्यामध्ये सव्वा लाखाची रोकड आणि टॅब होता.
पिशवी विसरल्याचे लक्षात आल्यावर कलाठीया यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी तपास पथकाला त्वरीत रिक्षाचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस शिपाई शरद घोरपडे यांनी तातडीने नाना पेठेतील अरुणा चौक ते निवंडुग्या विठोबा मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. रिक्षावरील क्रमांकावरुन शोध घेण्यात आला. रिक्षाचालक अमीर शेख (वय ४५, रा. लष्कर) यांचा शोध घेतला. त्याने रिक्षात सापडलेली पिशवी पोलिसांना परत दिली.