इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहराची वाढती लोकसंख्या पाहता नव्याने सुरू करण्यात आलेल्या सात पोलीस ठाण्याच्या प्रभावी कामकाजासाठी पुण्यातील गुन्हे शाखेचे मनुष्यबळ वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे मनुष्यबळ वाढविण्यात येणार असून सध्या कार्यरत ३६४ कर्मचाऱ्यांमध्ये आणखी २०० कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.
पुणे पोलिसांची गुन्हे शाखा ही महत्त्वाची शाखा असून गुन्हेगारांवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाईत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेचा महत्वपुर्ण सहभाग असतो. गेल्या काही महिन्यांपासून शहराची हद्द वाढली आहे. नव्याने सात पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहेत. वाढलेल्या पोलीस ठाण्यांमुळे कार्यकक्षेत वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. तर, गुन्हे शाखेचे प्रमुख सहा युनिट आणि खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक यांची प्रत्येक दोन अशी सहा मिळून एकूण १२ पथके आहेत. शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने गुन्हे शाखेने तीन स्वतंत्र पथक तयार केले आहेत. या पथकांच्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एक अधिकारी आणि आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा या पथकांत समावेश असणार आहे.