Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे पोलिसांची गुन्हे रोखण्यासाठी अनोखी शक्कलः तोडफोड, जाळपोळ केल्यास अल्पवयीन आरोपींच्या पालकांवर...

पुणे पोलिसांची गुन्हे रोखण्यासाठी अनोखी शक्कलः तोडफोड, जाळपोळ केल्यास अल्पवयीन आरोपींच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मागील काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये वाहन तोडफोड, जाळपोळ अशा घटना वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीकादेखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुणे शहरातील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, डीबी अधिकारी, कर्मचारी, गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी, कर्मचारी यांची एकत्रित बैठक पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या वेळी मागील तीन वर्षांतील अशा प्रकारच्या घटनांचा आढावा घेऊन एक विशेष योजना कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले आहे. वाहन तोडफोडी व जाळपोळीच्या घटनात २० टक्के आरोपी हे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे यापुढील काळात या गुन्ह्यात अल्पवयीन आरोपी आढळल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यासंदर्भात दोषी मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या वेळी पुण्याचे सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. या बैठकीत सांगण्यात आले की, या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग नियंत्रित करणे या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबवण्यात याव्यात यासाठी यापूर्वीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींची यादी करून त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे, पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवावे तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे, मागील तीन वर्षांमध्ये वाहन तोडफोड, जाळपोळ या घटना शहरातील कोणत्या कोणत्या भागात घडल्या आहेत ते परिसर देखरेखीखाली आणले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कमी उत्पन्न असलेल्या परिसरात होतात घटना

कमी उत्पन्न असलेल्या परिसरात अशा प्रकारच्या घटना अधिक प्रमाणात घडत असल्याचे विश्लेषणात दिसून आले आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये गुन्हे होऊ नये यासाठी जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून आयोजन केले जाणार आहे. त्याचसोबत व्यापारी, नागरिक यांच्या मदतीने समुपदेशनावर भर दिला जाणार आहे. गुन्हे विश्लेषणात तोडफोड करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार कमी असून भुरटे आरोपी अधिक असल्याचे दिसून आले आहे. तसेच यामागे कोणत्या टोळ्या नसून वैयक्तिक गोष्टीतून हे प्रकार घडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments