इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संत प्रयाग नामक एक खासगी ट्रॅव्हल मंगळवारी सकाळी पुण्याहून परभणीकडे येत असताना या बसमधून प्रवास करत असलेल्या एका जोडप्याने बाळाला जन्म दिला. मात्र, त्यांनी पाथरीपासून दोन किलोमीटरवर देवनांद्रा शिवारात कॅनॉल जवळ हे नवजात अर्भक ठेवलं आणि तिथून पळ काढला.
नवजात बाळाला रस्त्यावरून पाहून काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. येथील लोकांनी बसमधील एका जोडप्यावर संशय व्यक्त करत पोलिसांना याबाबत सांगितलं. यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग केला व आरोपींना ताब्यात घेतले.
ऋतिका ढेरे आणि अल्ताफ शेख असं या जोडप्याचं नाव आहे. दोघेही गेल्या दिड वर्षांपासून चाकण येथील परिसरात राहत होते. आम्ही नवरा बायको असल्याचा त्यांनी दावा केला आहे. नवजात बाळाचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने या दोघांनी या नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फेकून दिल्यानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला होता, तर काही तासापूर्वीचं महिलेने बाळाला जन्म दिल्याने तिला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अल्ताफ शेख याला पोलिसांनी नोटीस बजावली असून त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.