Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूज'पुणे इसिस' प्रकरणात 'एनआयए'कडून चारजणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल

‘पुणे इसिस’ प्रकरणात ‘एनआयए’कडून चारजणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – महाराष्ट्र, गुजरातसह पुणे शहरात स्फोट घडवून आणण्याच्या कटात सहभागी असलेल्या ‘पुणे इसिस’ प्रकरणातील आणखी चार आरोपींविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या चार आरोपींसह आत्तापर्यंत ११ संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याची माहिती ‘एनआयए’कडून गुरुवारी देण्यात आली.

महम्मद शाहनवाझ आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी चार आरोपींची नावे आहेत. ‘एनआयए’ने यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात सात आरोपींपैकी शामिल नाचन याच्यावर अतिरिक्त आरोप दाखल केले आहेत.

पुण्यातील कोथरूड परिसरात जुलै २०२३ मध्ये दुचाकी चोरीच्या संशयावरून पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले होते. कोंढव्यात घरझडतीसाठी जात असताना त्यापैकी महम्मद शाहनवाझ आलम पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. त्याला ‘एनआयए’ने मागील दोन नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तपास यंत्रणेने महम्मद आलमच्या कपड्यांमधून ‘डीएनए’चे नमुने घेतले होते. त्या नमुन्यावरून त्याची ओळख पटली होती.

सर्व आरोपी इसिस दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. आरोपींनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. महाराष्ट्र, गुजरात आणि पुणे शहर परिसरात स्फोट घडवून आणण्याच्या कटात त्यांचा सहभाग होता, असे ‘एनआयए’च्या तपासात समोर आले आहे.

आरोपी गोपनीय संवाद अॅप्सद्वारे परदेशातील हँडलरच्या संपर्कात होते. ते दरोडे आणि चोरी करून दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करत होते. तसेच, त्यांना हँडलर्सकडून निधी मिळत होता. आरोपींनी पुण्यातील कोंढवा भागात स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पश्चिम घाटातील जंगलात गोळीबाराचा सराव आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींकडून इसिस ‘खलिफा’च्या नावाने घेतलेले ‘बयाथ’ (प्रतिज्ञा), ड्रोन, कपडे आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. शामिल नाचनशिवाय दाखल केलेल्या मूळ आरोपपत्रात महम्मद इम्रान, महम्मद युनूस साकी, कादीर दस्तगीर पठाण, सीमाब काझी, झुल्फिकार अली बडोदावाला आणि अकीफ नाचन या आरोपींचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments