इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जी बीएस) उद्रेक वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिका सतर्क झाली असून महापालिकेकडून पाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासण्यात आले असून, त्यातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने धोक्याचा इशारा दिला असून पुणेकरांचे टेन्शन आता वाढलं आहे.
दरम्यान राज्यात जीबीएस ची रुग्णसंख्या 224 वर गेली आहे. यामधील 195 रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. जीबीएसचे आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले असून त्यात पुणे महापालिका 46, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे 95, पिंपरी-चिंचवड महापालिका 33, पुणे ग्रामीण 36 रुग्णसंख्या आहे. एकीकडे पुण्यामध्ये जीबीएसने थैमान घातलं आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचं समोर आला आहे. यानंतर महापालिकेकडून पाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 7 हजार 115 नमुने तपासण्यात आले आहे. त्यातील 138 पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून पुरवठा विभागाला शुद्ध पाणी पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर येताच पुणेकर चिंतेत आले आहेत.
या दूषित पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जिवाणू आढळुन येत आहेत. त्यामुळे ज्या भागात पाणी दूषित आढळले त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली आहे. तसेच शहरातील नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे