इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात मुळसधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या तर कुठे वसाहती पाण्याखाली गेल्या. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर बंदी आणण्यात आली होती. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद राहतील, अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
मुसळधार पावसामुळे कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पर्यटन स्थळी जमावबंदीचे आदेश 2 जुलै रोजी दिले होते. हे आदेश 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. परंतु पुण्यात सध्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. पावसाची संततधार सुरू आहे. आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आज गुरुवारपासून (दि.1 ऑगस्ट) शिथिल करण्यात आले आहेत.
मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यांतील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आता शिथिल करण्यात आले. मात्र, स्थानिक परिस्थिती पाहता प्रतिबंधात्मक आदेश लागू करायचे किंवा नाही, याचा निर्णय प्रांताधिकारी यांनी घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काल (बुधवारी) दिले आहेत.
पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढून कसलीही दुर्दैवी घटना घडू नये, याकरिता आता स्थानिक परिस्थिती पाहून संबंधित प्रांताधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढावेत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.